प्रसंगी मी माघार घेईन पण,दिपकआबांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आमदार शहाजीबापू पाटील
दिपकआबांच्या जन्मदिनी आजी-माजी आमदारांचा दोस्ताना
प्रसंगी मी माघार घेईन पण,दिपकआबांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आमदार शहाजीबापू पाटील
दिपकआबांच्या जन्मदिनी आजी-माजी आमदारांचा दोस्ताना
सांगोला - डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे तरी माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस आहे म्हणून मला यावं लागलं. मी वाढदिवसाला आलो नसतो तरी मला माझ्या दोस्ताने मला समजून घेतले असते पण, कार्यकर्त्यांत विनाकारण संभ्रम निर्माण झाला असता. कार्यकर्त्यांनी कुणीही अजिबात टेन्शन घेऊ नका आगामी पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही दोघेही आमदार होणार आहे. दिपकआबांना आमदार करण्यासाठी प्रसंगी मी माघार घेईन पण दिपकआबांना आमदार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा निर्धारच सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.
रविवार दि ७ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळावा आणि शिलाई मशिन सायकल वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आमदार शहाजीबापू यांनी तुफान फटकेबाजी करत महाविद्यालयीन काळापासून आपल्या मैत्रीचे अनेक किस्से सांगून जुन्या आठवणी जागवल्या. यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आमदार निलेश लंके कल्याण काळे उमेश पाटील जयमाला गायकवाड रफिक नदाफ पी सी झपके बाबुराव गायकवाड आदीसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, आमची दोस्ती आजची नाही तर महाविद्यालया पासून आहे एकाच बुलेटवर आम्ही तब्बल ११ वर्ष प्रवास केला आहे. आमच्या राजकीय वाटा जरी वेगळ्या असल्या तरी आम्ही कधीच एकमेकात असलेला जिव्हाळा कमी होऊ दिला नाही. सध्या तर आम्ही एकाच आघाडीत काम करत आहोत. २०१९ ला दिपकआबांनी पाठिंबा दिल्याने मी आज आमदार आहे त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी प्रसंगी मी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेईन पण दिपकआबांना आमदार करून दाखवेन असेही यावेळी शहाजीबापूंनी आवर्जून नमूद केले.
दरम्यान माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकताच ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार नाही असा निर्धार बोलून दाखवला होता. त्यानंतर बापूंनी ही आपणच विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचा इरादा बोलून दाखवला होता त्यामुळे या जिवलग मित्रात सर्व काही आलबेल नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते मात्र माजी आमदार दिपकआबांच्या जन्मदिनी शहाजी बापूंनीच एक पाऊल पुढे टाकत या सर्व विषयाला पूर्णविराम दिला
चौकट - आबांचाही बापूंच्या सुरात सूर...!!
माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या जन्मदिनी शुभेच्छाचा बॉम्ब फोडत शहाजीबापूंनी आपल्या मित्राला आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला यानंतर दिपकआबांनीही आपल्या मनोगतात बोलताना सांगोला तालुक्याचा आमदार कोण होईल हे मी आणि बापू दोघे मिळूनच ठरवू तिसऱ्याने कुणी भ्रमात राहू नये किंवा आमदार होण्याची स्वप्ने पाहू नये असा इशारा नाव न घेता विरोधकांना दिला.