सेंद्रिय शेतीचे प्रश्न राज्य व केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार -  शरद पवार

मोर्फा तर्फे आयोजित सेंद्रिय व विषमुक्त शेतकऱ्यांची खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत संवाद चर्चा

सेंद्रिय शेतीचे प्रश्न राज्य व केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार -  शरद पवार

सेंद्रिय शेतीचे प्रश्न राज्य व केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार -  शरद पवार

मोर्फा तर्फे आयोजित सेंद्रिय व विषमुक्त शेतकऱ्यांची खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत संवाद चर्चा

सांगोला - सेंद्रिय व विषमुक्त शेतीतील प्रश्न मोर्फा संघटनेच्या माध्यमातून समजून घेऊन ते प्रश्न राज्य व केंद्र सरकार पुढे मांडणार असून त्याची सोडवणूक होईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करू असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांनी व्यक्त केले.काल दिनांक 13 ऑगस्ट रोजी सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे महाऑरगॅनिक अँड रेसिड्यूफ्री फार्मर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य अर्थात मोर्फा या राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने सेंद्रिय व विषमुक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी खासदार पवार बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी जलसंपदा मंत्री आ.जयंतराव पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, धनश्री परिवाराचे संस्थापक  प्रा. शिवाजीराव काळुंगे,  विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे, सौ. जयमलाताई गायकवाड, हर्षदा लॉन्सचे मालक नाथाभाऊ जाधव  उपस्थित होते.
 पुढे बोलताना पवार म्हणाले की, सेंद्रिय व विषमुक्त शेतीमध्ये उत्पादनाबरोबर मार्केटिंगचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी त्याची विश्वासार्हता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शेती क्षेत्रात बदल होत आहेत त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजेत . मोर्फा संघटना राज्यात विषमुक्त व सेंद्रिय शेतीतील प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणत आहे.सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी आपण संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन सेंद्रिय व विषमुक्त मालाचे उत्पादन वाढविणे व मार्केटिंग करण्यासाठी मदत करू असेही पवार यांनी बोलताना आश्वासन दिले.

यावेळी बोलताना माझी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील म्हणाले की, जगभरात सेद्रीय व विषमुक्त शेतीमालाचे महत्त्व वाढत आहे. सदर उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी मोर्फा संघटनेच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार बरोबर चर्चा करून प्रश्नांची सोडवणूक करू.
मोर्फा संघटनेचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे बोलताना म्हणाले की, सेंद्रिय व विषमुक्त शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेत आहेत पण मार्केटिंग मध्ये शासनाच्या मदतीची अत्यंत गरज आहे. डाळिंब द्राक्षे सारख्या फळ पिकांची निर्यात करण्यासाठी त्याच्या वाहतूकीवर सवलत मिळणे अत्यंत गरजेचे आहे तरच शेतकऱ्यांना प्रीमियम रेट मिळू शकतो. कोविड नंतर या तीन वर्षापासून जहाजाच्या वाहतुकीमध्ये चार पट वाढ झालेली आहे व निर्यातीसाठीचे अनुदान बंद केले आहे त्यामुळे आपले डाळिंब निर्यातीत अडचणी येत असून चांगल्या क्वालिटीच्या डाळिंबाला चांगला भाव मिळणे अवघड झाले आहे. नैसर्गिक शेती पेक्षा आम्हाला कमर्शियल ऑरगॅनिक फार्मिंग करणे अत्यंत गरजेचे असल्याचे पडवळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोर्फाचे संचालक अमरजीत जगताप यांनी केले. सदर सेंद्रिय व विषमुक्त शेती चिंतन बैठकीला राज्यभरातून मोर्फाचे शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड प्रभाकर चांदणे संजय कट्टे, आनंदराव पाटील, अशोक नरळे ढेकळे साहेब, नामदेव  सिद, नाना माळी, दिलीप बंडगर  आदी उपस्थित होते.  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोर्फा चे संचालक हरिभाऊ यादव, संजय दवले, नितीन तावरे, केशर माती उद्योग समूहाचे संचालक सतीश पाटील, संजय दिघे, यशराज गांडूळ खत प्रकल्पाचे संचालक सुरेश पवार, किसान गुरुचे संचालक संजय मेटकरी, नागेश बिचुकले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भारत मुढे यांनी केले.

चौकट - मोर्फा राज्य संघटनेसाठी पुणे आणि मुंबई येथे सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खा. शरद पवार यांनी आपल्या भाषणातून दिले.

चौकट  - सेंद्रिय शेती बरोबर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. विषमुक्त व अँटोबायोटिक फ्री दूध उत्पादन काळाची गरज असून अशा दुधाला योग्य किंमत मिळण्यासाठी शासन व खा. शरद पवार यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू राहील. दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्यासाठी मुख्यमंत्र्याबरोबर राज्यातील दूध उत्पादकांची बैठक घेण्याची मागणी कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी दूध उत्पादकांच्या शिष्टमंडळासह लेखी निवेदनाद्वारे केली. त्यावेळी खासदार पवार यांनी मुख्यमंत्र्याबरोबर लवकरच भेट घडवून आणण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.