सरकारच्या निधीची वाट न बघता अरणचा विकास करणार - आ.रोहित पवार

अरणचा विकास करणारांना साथ देणार - कल्याण आखाडे

सरकारच्या निधीची वाट न बघता अरणचा विकास करणार - आ.रोहित पवार

सरकारच्या निधीची वाट न बघता अरणचा विकास करणार - आ.रोहित पवार

अरणचा विकास करणारांना साथ देणार - कल्याण आखाडे

पंढरपूर - तिर्थक्षेत्र अरण विकासाची मागणी शासन दरबारी लावून धरू मात्र सरकारच्या निधीची फार वाट न बघता अरणच्या विकासासाठी पुढाकार घेऊन अरणचा विकास करणार असल्याची जाहीर घोषणा आ.रोहित पवार यांनी केली. तर अरणचा विकास व्हावा हा सावता परिषदेचा ध्यास आहे. त्यामुळे अरणच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्यांच्या पाठीशी राहून साथ देणार असल्याची स्पष्ट ग्वाही सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी दिली.

संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी श्रीक्षेत्र अरण येथे सर्वात उंच वारकरी ध्वजाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी आ. पवार व श्री. आखाडे बोलत होते. पुढे बोलताना आ. रोहित पवार यांनी अरणच्या विकास प्रश्न एरणीवर आणून आवाज उठविल्याबद्दल सावता परिषदेच्या कार्याची प्रशंसा करताना यापुढे याप्रश्नावर आपण स्वतः जातीने लक्ष घालून यासाठी व्यक्तिगत पातळीवरूनही लागेल ते योगदान देण्याचे आश्वासन दिले. विकासाच्या बाबतीत अरण कमालीचे मागे असल्याची खंत व्यक्त करून अन्य तिर्थक्षेत्रांच्या धर्तीवर अरणचाही विकास साधण्यासाठी सावता परिषद व्यापक प्रयत्न करेल असे कल्याण आखाडे यांनी म्हटले.

या कार्यक्रमाप्रसंगी सावता महाराज यांचे वंशज रमेश महाराज वसेकर, यांच्यासह सर्व वंशज मंडळी, आ. बबनदादा शिंदे, सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयुर वैद्य, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत व रमेश बारसकर, भाजपाचे  ज्येष्ठ नेते शंकर वाघमारे, माजी जि.प. सभापती भारत शिंदे व शिवाजी कांबळे, ट्रस्टचे सचिव ॲड. विजय शिंदे, सावता परिषदेचे प्रदेश महासचिव गणेश दळवी, प्रदेश उपाध्यक्ष महादेव ताटे, सौ.साधना राऊत, मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, प्रदेश प्रवक्ते राजीव काळे, प्रदेश संघटक शिवाजी येवारे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ. मनिषाताई सोनमाळी, अरणच्या सरपंच सुरत्नप्रभा ताकतोडे, मराठवाडा अध्यक्ष शिवानंद झोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

१०० फुट उंच असलेला वारकरी ध्वज फडकविण्याचा हा सोहळा अतिशय दिमाखदार झाला. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजिवन समाधी स्थळी ध्वजाचे विधीवत पूजन झाल्यानंतर गावातून ध्वज स्तंभापर्यंत टाळ मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. आ. रोहित पवार यांचे सावता परिषदेच्या वतीने सावता महाराजांची पगडी, कांदा-मुळा-भाजी व विळा देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सावता परिषदेचे विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, माळी समाज बांधव व वारकरी संप्रदायातील मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.