पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ तसेच प्रामुख्याने भीमा नदीकाठच्या भागातील वीज समस्येवर तातडीने उपाययोजना करा - आ.समाधान आवताडे

आ.समाधान आवताडे यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ तसेच प्रामुख्याने भीमा नदीकाठच्या भागातील वीज समस्येवर तातडीने उपाययोजना करा - आ.समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ तसेच प्रामुख्याने भीमा नदीकाठच्या भागातील वीज समस्येवर तातडीने उपाययोजना करा - आ.समाधान आवताडे

आ.समाधान आवताडे यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

पंढरपूर - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ व प्रामुख्याने भीमा नदीकाठच्या भागात घरगुती, शेती पंप आणि उद्योगांसाठी होत असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार समाधान आवताडे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या महाराष्ट्र विधान मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर तालिका अध्यक्ष आमदार समाधान आवताडे यांनी माझ्याही मतदारसंघात व भीमा नदीकाठच्या भागात विजेची समस्या भेडसावत असल्याने ऊर्जा विभागाला तसे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे. यामुळे लवकरच ग्रामीण भागातील विजेची समस्या दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार आवताडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. महावितरणच्या नियमानुसार शेती पंपांसाठी सलग आठ तास वीज, भगीरथ योजनेअंतर्गत घरगुती वापरासाठी नियमित सिंगल फेज वीज आणि उद्योगांसाठी अखंडित वीजपुरवठा अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक भागांत शेतकऱ्यांना चार तासही पुरेशी वीज मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सौरऊर्जेमुळे दिवसा आठ तास वीज दिली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागात कमी दाबाने आणि खंडित स्वरूपात वीजपुरवठा होत असल्याने शेतीची कामे प्रभावित होत आहेत. तसेच ग्रामीण भागात घरगुती वापरासाठी सकाळी आणि सायंकाळी आवश्यक असलेली सिंगल फेज वीजही नियमित मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असताना रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्याने गैरसोयी वाढल्या असून चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याची बाब आवताडे यांनी पत्रात नमूद केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये नागरिकांकडून मोर्चे आणि आंदोलने करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांसोबत दोन ते तीन वेळा बैठका घेऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नसल्याचे आवताडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने सलग आठ तास वीज, उद्योगांसाठी अखंडित वीजपुरवठा तसेच नागरिकांना सुरळीत सिंगल फेज वीज उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आमदार आवताडे यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने वीज समस्येवर लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चौकट

सध्या महाराष्ट्र विधान मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर तालिका अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आमदार समाधान आवताडे यांनी माझ्याही मतदारसंघात विजेची समस्या भेडसावत असल्याने मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली असून ऊर्जा विभागाला आदेश दिले असल्याचे सांगितले आहे. यामुळे लवकरच ग्रामीण भागातील विजेची समस्या दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.