पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीनची मागणी; विक्रम शिरसट करणार पाठपुरावा ; सर्वसामान्य रुग्णांना होणार मोठा दिलासा.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीनची मागणी; विक्रम शिरसट करणार पाठपुरावा ; सर्वसामान्य रुग्णांना होणार मोठा दिलासा.
पंढरपूर - उपजिल्हा रुग्णालयात विविध अत्याधुनिक तपासणी सुविधा आणि सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध असल्या तरी अद्याप एमआरआय स्कॅन (MRI - Magnetic Resonance Imaging) ची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना खाजगी रुग्णालये किंवा निदान केंद्रांचा आधार घ्यावा लागतो. या तपासणीसाठी साधारणपणे तीन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील रुग्णांवर आर्थिक भार पडत आहे.अनेक वेळा गंभीर किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने एमआरआय करणे आवश्यक असते.

अशा वेळी रुग्णांना जवळच्या खाजगी केंद्रात धाव घ्यावी लागते.
सरकारी व्यवस्थेत एमआरआयची गरज भासल्यास रुग्णांना अनेकदा सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात येते. मात्र त्यामुळे वेळेचा अपव्यय होऊन उपचारांमध्ये विलंब होण्याची शक्यता निर्माण होते.
याच पार्श्वभूमीवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सरडे यांच्याशी माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी चर्चा करून रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच या मागणीचा पाठपुरावा महाराष्ट्र आरोग्य विभागाकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
"पंढरपूर हे धार्मिक आणि तालुकास्तरीय महत्त्वाचे केंद्र असून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात एमआरआय सुविधा उपलब्ध झाल्यास शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल," असे मत विक्रम शिरसट यांनी व्यक्त केले.
या मागणीमुळे पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.